"10 वी मराठी 'उत्तमलक्षण' कवितेचे रसग्रहण, स्वाध्याय प्रश्नोत्तर, काव्यसौंदर्य व कवितेचा अर्थ समजून घेण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक."
४. उत्तमलक्षण
संत रामदास (१६०८ ते १६८२) :
संतकवी. संत रामदासांच्या
काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि
आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात
आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’
ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी
केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय
आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे.
संत रामदास यांनी या रचनेत
आदर्श व्यक्ती ची लक्षणे सांगि तली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना
त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग
स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात.
श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण
। सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये ।
येकायेकीं ।।२।।
जनींआर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये ।
कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये ।
अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये ।
कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं
केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये ।
विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये ।
कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये ।
असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट
सत्याची ।।१०।।
(श्रीदासबोध-दशक द्वितीय,समास दुसरा,'उत्तमलक्षण')
कवितेचा
भावार्थ
श्रीदासबोध या ग्रंथातून घेतलेल्या रचनेत समर्थ रामदास यांनी आदर्श
व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे.व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये, हे सांगताना त्याने सत्याच्या मार्गावर चालावे, विवेकपूर्ण वागावे व स्वतःचे कल्याण करावे असा संदेश दिला आहे.
उत्तम पुरुषाची (आदर्श
व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात –
श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे
सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व
गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. || १ ।।
पूर्ण माहिती असल्याशिवाय
कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये
फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन
उचलू नये. || २ ।।
लोकांनी केलेली विनंती लक्षात
घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू
नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।।
जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू
नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच
सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.)
मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥
काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. ते कुणाबद्दल
उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये
संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही ते काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥
सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या
मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची
पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥ ६॥
कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत
आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे.
दुसऱ्यांना दुः ख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा
बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥
स्वत:च्या मनाचा मोठेपणा
कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी
होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्युयाचे ओझे लादू नये. ॥८।।
सत्याचा मार्ग कधी सोडू
नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ
नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान,व्यर्थ गर्व करू नये.॥९।।
कधीही अपकीर्ती होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढवावी, विवेकाने नेहमी ठामपणे
सत्याचीच वाट धरावी. ॥१०।।
कवितेचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा.
(१)
आकृत्या
पूर्ण करा.
(अ)
संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
➤ अपकीर्ती
टाळावी.
➤ सत्कीर्ती
वाढवावी.
➤ सत्याची
वाट धरावी.
(आ)
कधीही करू नयेत अशा गोष्टी
➤ पुण्यमार्ग
सोडू नये.
➤ पैज
किंवा होड लावू नये.
➤ कुणावरही
आपले ओझे लादू नये.
➤ असत्याचा
अभिमान बाळगू नये.
Uttam lakshan swadhyay iyatta dahavi
(इ)
तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
( खालील उत्तर फक्त मार्गदर्शक आहे.स्वमत
लिहा.)
गुण
१) इतरांविषयी वाईट न बोलणे.
२) गरजूंना मदत करणे
३) जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास.
दोष
१) बहिण-भावंडां सोबत मत्सर
२) कुणावरही लवकर विश्वास ठेवणे.
३) कधीकधी आळस येतो.
(२)
खालील व्यक्तींशी कसे
वागावे असे संत रामदास म्हणतात.
( अ) तोंडाळ ⇒
तोंडाळांशी भांडू नये.
(आ) संत
⇒ संतसंग
खंडू नये.
(३
) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी
दक्षता
(१) आळस
➤ आळसात सुख मानू नये.
(२) परपीडा
➤ परपीडा करू नये.
(३) सत्यमार्ग
➤ सत्यमार्ग सोडू नये.
(४)
काव्यसौंंदर्य.
(अ)
खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा.
'जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं
नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।'
उत्तर :
आशयसौंदर्य :
'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ
रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत.
त्यांपैकी वरील
ओवीमध्ये तीन लक्षणांची चर्चा केली आहे.
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना
व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये.
लोकांनी केलेली विनंती अमान्य करू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट
मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून चांगल्या
मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्पुयमार्गाने जाण्याचे
सोडू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये
जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. 'तोडू नये, जोडू
नये, सोडू नये' अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये
आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व
ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो.
ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
(आ)
'सभेमध्ये
लाजों नये । बाष्फळपणे बोलों नये ।',या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर:
'उत्तमलक्षण' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श
गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण वरील चरणात
सूचित केले आहे.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.
माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे,
हे सांगताना संत रामदास म्हणतात -
सभेमध्ये वावरताना, आपले
मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले
हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये. बाष्कळपणे बोलू नये.
उत्तम पुरूषाचे एक मर्मग्राही लक्षण या
ओवीतून मांडले आहे.
(इ) आळसे सुखसु मानूं नये', या ओळीचा तुम्तुहांला समजलेला अर्थ
स्पष्ट करा.
उत्तर:
'उत्तमलक्षण' या ओव्यांंमध्ये संत रामदास यांनी उत्तम
व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले
आहे.
'आळस' हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे.
त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. 'आळसे कार्यभाग नासतो !' या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच
तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात 'आळस' हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये
आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटखुंते, भविष्य अंधारते. ते आळसामुळे मनाला
जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता
होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सूख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.
कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.
कविता - उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री : संत रामदास.
- कवितेचा रचनाप्रकार : ओवी.
- कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.
- कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.
- कवितेतून व्यक्त होणारा ( स्थायी )भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास
- कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात आल्यावर मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने ही कविता आपली स्वतःची स्वतः साठी असलेली वाटते.
- कवितेतून मिळणारा संदेश : प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला समाज समर्थ समाज निर्माण होतो. हाच संदेश या कवितेतून मिळतो.
COMMENTS